शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करायचा की नाही यावर वाद सुरु असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तृप्ती देसाई यांनी या संदर्भात केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहिले आहे आणि सुरक्षेची मागणीही केली आहे. तृप्ती देसाईंसोबत सहा महिलाही असणार आहेत.

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली. ज्यानंतर ज्या महिला शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्या त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. या प्रकरणी एक पुनर्विचार याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरला हे मंदिर उघडण्यात आले होते. ६ नोव्हेंबरला या ठिकाणी पुन्हा एकदा हिंसाचार घडला होता. ज्यामध्ये महिला आणि कॅमेरामन जखमी झाले. गेल्या महिन्यात झालेला वाद आणि या महिन्यात घडलेला हिंसाचार या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी सुरक्षेची मागणी करणारे पत्र पी. विजयन यांना लिहिले आहे.

तृप्ती देसाई यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार की नाही हा आता मोठा प्रश्न आहे. कारण या मंदिरात ११ वर्षांखालील मुलींना आणि ५० वर्षांच्या पुढील महिलांना येण्यास मनाई नाही. मात्र ज्या महिलांना मासिक पाळी येते अशा सगळ्या महिलांना या मंदिरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाद, हिंसाचार या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या जेव्हा या ठिकाणी भेट देतील तेव्हा काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.