न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. न्या. लोया प्रकरणात ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी त्यांचे मुद्दे कोर्टात मांडलेत. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. कोर्टाच्या निकालानंतर या आरोपांमध्ये किती तथ्य होते हे स्पष्ट होईलच, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्या. लोया मृत्यूप्रकरणावर भाष्य केले. न्या. लोया मृत्यूप्रकरणात न्यायपालिका दुभंगलेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी त्यांचे मुद्दे कोर्टात मांडलेत. सरकारनेही त्यांची बाजू मांडली आहे. आता कोर्टाच्या निकालानंतर या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे स्पष्ट होईलच, असे त्यांनी सांगितले. सोहराबुद्दीन प्रकरणात माझी निर्दोष सुटका झाली. माझ्यावर राजकीय सूडातून त्यावेळी कारवाई झाली होती, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

‘तुम्ही आरोप कितीही करा, पण त्यात तथ्य नसेल तर उपयोग नाही. कधी कधी व्यक्तिगत आरोपांमुळे वाईट वाटते. पण मी राजकारणात असल्याने यापासून पळ काढू शकत नाही. मला अशा आरोपांचा सामना करावाच लागेल. आता खोटे आरोप करावे की नाही हे विरोधकांनी ठरवावे, पण न्यायालयात हे आरोप टिकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींमुळे निवडणुकीत मदत होते. पण काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडे मुद्दे नाहीत, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला कौरवांची उपमा दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना अमित शहा म्हणाले, कोण कौरव आणि कोण पांडव हे ठरवण्याचे काम जनतेचे असते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कोण पांडव यांचे उत्तर जनतेने दिले आहे. उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या निकालांकडे देशातील जनतेचा जनादेश म्हणून बघता येणार नाही. आम्ही या पराभवाची दखल घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले तरी त्याचा परिणाम भाजपावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.