कपिल मिश्रांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अखेर अरविंद केजरीवाल यांनी मौन सोडले आहे. सत्याचाच विजय होणार अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली असून मंगळवारपासून दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनापासून याला सुरुवात होईल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल विरुद्ध कुमार विश्वास या वादात विश्वास यांची बाजू घेणाऱ्या कपिल मिश्रांना शनिवारी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. यानंतर कपिल मिश्रांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांना दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी घेताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते असा आरोप त्यांनी केला होता. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केजरीवालांवरील आरोप फेटाळून लावले होते. केजरीवाल यांच्यावरील आरोप निराधार असून त्यावर प्रतिक्रिया देणेही योग्य ठरणार नाही असे त्यांनी म्हटले होते. कपिल मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप आपने मंगळवारी केला होता.

विशेष म्हणजे कुमार विश्वास यांनीदेखील अरविंद केजरीवाल यांचा बचाव केला होता. केजरीवाल लाच घेतील असा विचार त्यांचे विरोधकही करणार नाही असे विश्वास यांनी म्हटले होते. योगेंद्र यादव यांनीदेखील केजरीवालांना पाठिंबा दर्शवला होता. कपिल मिश्रांच्या आरोपांनंतर अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. शेवटी सोमवारी संध्याकाळी उशीरा केजरीवाल यांनी ट्विटरवरुन या वादावर प्रतिक्रिया दिली. ‘सत्याचाच विजय होणार, उद्यापासून सुरु होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनापासून याला सुरुवात होणार’ असे केजरीवालांनी म्हटले आहे.

केजरीवालांनी ट्विट केल्यावर कपिल मिश्रांनीही ट्विट करुन केजरीवालांना आव्हान दिले आहे. ‘तुम्ही बहुमताचा खेळ खेळत बसा. उद्या सर्वांना मला शिव्या द्यायला लावा. पण तुम्हाला चौकशीचा सामना करावाच लागेल’ असे कपिल मिश्रांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी आपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीत कपिल मिश्रा यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय एकमताने मंजुर करण्यात आला होता. त्यामुळे कपिल मिश्रा हे पक्षात एकटे पडल्याचे दिसते.