मुंबई: ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात नव्याने निदान झालेल्या क्षयरुग्णांपैकी ५७१ रुग्ण करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. तर करोनाबाधितांमध्ये केलेल्या क्षयचाचण्यांमध्ये ५२६४ रुग्णांना क्षयरोगाची बाधा झाल्याचे आढळले आहे.

क्षय आणि करोनाची लक्षणे समान असल्याने क्षयरुग्णांच्या करोना चाचण्या कराव्यात. तसेच करोनाबाधितांमध्ये क्षयरोगासारखी लक्षणे अधिक काळ असल्यास क्षयचाचणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्याने ऑक्टोबरपासून या रुग्णांमध्ये दोन्ही चाचण्या करण्यास सुरुवात केली.

ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात १,०३,५२२ क्षयरुग्णांचे निदान केले गेले. यातील ५७ टक्के रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या.  यामधून एक टक्का म्हणजे ५७१ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले. याच काळात १९,०२,७१८ करोनाबाधित रुग्ण आढळले. यातील ४,६७,०३२(२५ टक्के)  रुग्णांची क्षयरोगाची प्राथमिक तपासणी केली गेली. यातून केवळ ५०, ९६२ (२.६) टक्के रुग्णांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. या नमुन्यातून ५२६४ रुग्णांना क्षयरोगाची बाधा असल्याचे आढळले. या रुग्णांना क्षयरोगाचे उपचार लगेचच सुरू केले असून यांची नोंदणीही केल्याची माहिती राज्य क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अडकेकर यांनी दिली.

क्षयबाधितांपैकी किती जणांचा करोनाने मृत्यू झाला याची एकत्रित आकडेवारी सध्या राज्याकडे उपलब्ध नाही. ती एकत्रित लवकर एकत्रित केली जाईल, असे डॉ. अडकेकर यांनी सांगितले.