सीरियातील इस्लामिक स्टेटकडून (आयसिस) होणारा तेल पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठीच तुर्कीने रशियाचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे.
जागतिक हवामानबदल परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतीन सध्या पॅरिसमध्ये आहेत. यावेळी केलेल्या भाषणातच त्यांनी रशियाचे लढाऊ विमान पाडून तुर्कीने गंभीर चूक केली असल्याचे सांगितले. त्यांनी या परिषदेसाठी पॅरिसमध्ये आलेले तुर्कीचे अध्यक्ष ताईप एरेदग्वा यांची भेटही घेतली नाही. आमचे विमान पाडल्यानंतर आम्ही जी माहिती मिळवली, त्यामधून आयसिसकडून मिळणारे तेल सुरक्षित ठेवण्यासाठीच तुर्कीने आमचे विमान पाडले, असे पुतीन यांनी सांगितले.
दरम्यान, तुर्की आयसिसकडून तेल विकत घेते हा दावा ताईप एरेदग्वा यांनी फेटाळला असून, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीरियातील आयसिसच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी गेलेले रशियाचे विमान तुर्कीने पाडल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.