News Flash

फ्रान्स विरुद्ध टर्की : ‘शार्ली हेब्दो’ने छापलं एर्दोगन यांचं अंतर्वस्त्रांमधील व्यंगचित्र

या व्यंगचित्रावर एर्दोगन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय

टर्कीचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांचे आक्षेपार्ह चित्र काढल्याने टर्कीने थेट बदला घेण्याचा इशारा दिला आहे. प्रेषित महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांवरुन एका शिक्षकाची हत्या झाल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या त्यांच्याविरोधात मुस्लीम देशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरुन एर्दोगन यांनी मॅक्रॉन यांच्यावर थेट हल्लाबोल केल्यानंतर आता फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’ या मासिकाने एर्दोगन यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं आहे. या व्यंगचित्रामध्ये एर्दोगन हे अंतर्वस्त्रांमध्ये, हातात बिअर घेऊन स्कर्टमधील स्त्रियांकडे पाहताना दाखवण्यात आले आहेत. या व्यंगचित्रामधून मॅक्रॉन यांच्यावर टीका करणारे एर्दोगन हे स्त्री लंपट असल्याचा टोला शार्ली हेब्दोने लगावला आहे.

एर्दोगन यांचं असं व्यंगचित्र छापल्याबद्दल टर्कीने संताप व्यक्त केला असून यासंदर्भात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. टर्कीमधील एनटीव्हीने यासंदर्भात अंकाराने (टर्कीची राजधानी) टर्कीमधील फ्रान्स राजदुतावासातील वरिष्ठ अधिकऱ्यांना या व्यंगचित्रासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.

एर्दोगन यांनी स्वत: हे वादग्रस्त चित्र पाहिलेलं नाही. आपल्याला अशा अयोग्य मासिकाला जास्त महत्व द्यायचं नसल्याने मी ते पाहिलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “मला याबद्दल फारसं काही बोलायचं नाहीय. ज्या हलकट लोकांनी आमच्या प्रिय प्रेषितांचा अपमान केला आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. माझं चित्र काढून माझ्यावर खासगी स्तरावर जाऊन हल्ला केल्यापेक्षा आपल्याला प्राणाहून प्रिय असणाऱ्या प्रेषितांबद्दल जे झालं त्याचं मला जास्त वाईट वाटत आहे,” असं एर्दोगन आपल्या पक्षातील सहकाऱ्यांशी बोलताना म्हणाल्याचे एफपीच्या वृत्तात म्हटलं आहे. टर्की हा मुस्लीम बहुल देश असला तरी अधिकृतरित्या हा सर्वधर्म समभाव असणारा देश आहे. मात्र एर्दोगन यांच्या नेतृत्वाखील देशामध्ये पारंपारिक आणि राष्ट्रवादी विचारसरणी वेगाने वाढल्याचे दिसते.

दोन आठड्यांपूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना समोर आली. विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्या विषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीस गोळ्या झाडून ठार केलं. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद असं सांगत ‘इस्लाम आपले भविष्य हेरावून घेण्याच्या विचारात आहे मात्र हे कधीच होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली. यानंतर इस्लामिक देशांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. मागील काही दिवसांमध्ये अनेक इस्लामिक देशांमध्ये फ्रान्स आणि मॅक्रोन यांच्याविरोधात निदर्शने केली जात असल्याचे दिसून येत आहे. दिवसोंदिवस फ्रान्स आणि इस्लामिक देशांमधील वाद वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. मॅक्रॉन यांनी महंमद पैगंबरांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.

टर्कीचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी या प्रकरणासंदर्भात अधिकृत वक्तव्य जारी केलं. मॅक्रॉन यांनी मुस्लीम आणि इस्लामसंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचे दिसून येत असल्याचा टोला एर्दोगन यांनी लगावला. “ज्या देशात लाखो मुस्लीम राहतात तेथील प्रमुख नेत्यालाच श्रद्धा आणि स्वातंत्र्याबद्दलच फारशी माहिती नसेल तर याबद्दल आणखीन काय बोलावं?,” असंही एर्दोगन यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी फ्रान्समधील वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं. यावरुनच आता ‘शार्ली हेब्दो’ने एक व्यंगचित्र प्रकाशित केलं असून त्यामुळे टर्कीने याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

महंमद पैगंबरांचं कोणतंही व्यंगचित्र म्हणजे इश्वराची निंदा आहे असं मुस्लीम मानतात. त्यामुळेच आता मुस्लीम देशांनी फ्रान्समधील वस्तुंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र फ्रान्सने या बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला काही कट्टर अल्पसंख्यांकांचा डाव असल्याचे म्हटलं आहे. मात्र दिवसोंदिवस या प्रकरणाचे गांभीर्य वाढत असून फ्रान्सला मुस्लीम राष्ट्रांकडून होणारा विरोधही वाढताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 1:48 pm

Web Title: turkey erdogan slams scoundrels over charlie hebdo cartoon scsg 91
Next Stories
1 एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या
2 अपहरण! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या सुटकेसाठी रेल्वे धावली २४० किमी
3 गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं ९२ व्या वर्षी निधन
Just Now!
X