इस्तंबुल शहरातील सुलतान अहमत चौक या देश-विदेशातील पर्यटकांनी गजबजलेल्या परिसरात सीरियन दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात दहा जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता तुर्की सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली असली, तरी अद्याप कुणाचेही नाव समोर आलेले नाही. परंतु मागील वर्षभरापासून ‘आयसिस’ने वारंवार तुर्कस्तानला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य बनविले आहे.

सुलतान अहमत परिसरात निळी मशीद आणि हाजिया सोफिया या मध्ययुगीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या इमारतींसह अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. त्यांना भेट देण्यासाठी दर दिवशी हजारो पर्यटक या परिसरात दाखल होतात. या गर्दीला लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच हा दहशतवादी हल्ला घडविण्यात आला. या स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की, नजीकच्या वसाहतींमध्येही त्याचे पडसाद जाणवले. इस्तंबूलच्या प्रशासकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या बाँबस्फोटात १० जण मरण पावले. तर, १५हून अधिक जण जखमी झाले.

या हल्ल्यानंतर तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमद दावूतोग्लू यांनी देशातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली. त्या बैठकीला अंतर्गत व्यवहारमंत्री एफकान अला आणि गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख हाकान फिदान उपस्थित होते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये राजधानी अंकारा येथे झालेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यांत १०३ जण मृत्युमुखी पडले होते. हे हल्ले ‘आयसिस’ने घडविल्याचा आरोप तुर्कस्तानने केला होता. जर्मनीसह महत्त्वाच्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी यापूर्वीच आपल्या नागरिकांना इस्तंबुलवारी टाळण्याचा सल्ला दिला आहे. सुमारे दीड कोटी लोकसंख्येचे हे शहर मागील काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांना वारंवार बळी पडले आहे.

तुर्की प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट मध्ययुगीन रोमन सम्राट थिओडोसियस याच्या स्तंभाजवळ झाला.