तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत केलं.

अध्यक्ष एर्डोगान आणि पंतप्रधान मोदी यांनी ‘भारत-तुर्कस्तान व्यापारी परिषदेला हजेरी लावली.

भारत दौऱ्यावर येण्याआधी अध्यक्ष एर्दोगान यांनी ‘वर्ल्ड इज् वन न्यूज’ या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मात्र भारताच्या काश्मीर प्रश्नाबाबतच्या जागतिक भूमिकेला काहीशी छेद देणारी भूमिका स्पष्ट केली.

“काश्मीरप्रश्नी बहुपक्षीय चर्चा होण्याची गरज आहे” असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीवेळी स्पष्ट केलं. ‘काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा प्रश्न असून, त्यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही’ अशी भारताची ठाम भूमिका आहे. यामध्ये १९९०च्या दशकात अमेरिकालाही भारताने मध्यस्थी करू द्यायला नकार दिला होता. आता भारताच्या या भूमिकेला छेद देणारी भूमिका तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगान यांनी मांडली आहे.

“दक्षिण आशियामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आमचे मित्र आहेत. या दोघांमधल्या संबंधांचा नीट विचार केला तर ते नक्कीच सुधारण्यासारखे आहेत. पण काश्मीर प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे. या प्रश्नी बहुपक्षीय प्रयत्न होण्याची गरज आहे” असं अध्यक्ष एर्डोगान यांनी म्हटलं.

भारताकडून आतापर्यंत यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनुसार पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष एर्डोगान यांच्या अधिकृत भेटीनंतर काढण्यात येणाऱ्या संयुक्त पत्रकात जम्मू आणि काश्मीरबाबत थोडी सौम्य शब्दांत भूमिका मांडण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

सध्या पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या सीरियन युद्धात आणि त्यायोगे जागतिक दहशतवादाच्या प्रश्नावर तुर्कस्तान सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तुर्की अध्यक्षांनी काश्मीरविषयी मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरते.