तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीम एर्दोगन यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली आणि दहशतवादाविरोधातील लढय़ात तुर्कस्तानचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी काळजीचा प्रश्न असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

कोणताही हेतू, उद्दिष्ट, कारण अथवा तर्क दहशतवादाचे समर्थन करू शकत नाही, असे मोदी यांनी एर्दोगन यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

मोदी आणि एर्दोगन यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी तीन करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतच्या कराराचाही समावेश आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.

पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांच्या संदर्भाने मोदी म्हणाले की, जगभरातील देशांनी दहशतवादाचे जाळे नष्ट करण्यासाठी, त्यांची आर्थिक मदत थोपविण्यासाठी आणि सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबविण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे.

सुकमा जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध करून एर्दोगन म्हणाले की, दहशतवादाशी मुकाबला करताना तुर्कस्तान पूर्ण ताकदीनिशी भारताच्या बाजूने उभा राहील आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने रक्तपात घडविला आहे तेच त्यांच्याबाबत केले जाईल, असेही एर्दोगन म्हणाले.

काश्मीर प्रश्न व्यापक चर्चेद्वारे सोडवून शांतता प्रस्थापित करावी, काश्मीरमध्ये आणखी बळी जाण्याच्या प्रकारांना आळा घातला पाहिजे, व्यापक चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो, असे एर्दोगन यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.