टर्कीमध्ये अदनान ओकतारा या मुस्लीम समाजातील धार्मिक नेत्याला मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.  इस्तंबूलमधील एका न्यायालयाने लैंगिक अत्याचारासंदर्भातील १० प्रकरणांमध्ये या नेत्याला दोषी ठरवलं आहे. दोषी ठरलेल्या अदनानला एक हजार ७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनेकदा हा नेता कमी कपडे घातलेल्या तरुणींच्या घोळक्यात उभा असल्याचे फोटो टर्कीमध्ये चर्चेचा विषय ठरलेत. अदनान हा ऑनलाइन माध्यमामधून स्वत:ची एक धार्मिक वाहिनी चालवायचा. आपल्या कार्यक्रमामध्ये तो जेव्हा मानवाची जन्माचे रहस्य आणि रुढीवादी विचारांसंदर्भातील उपदेश द्यायचा तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक तरुणी अर्धनग्नावस्थेत नाचताना दिसायच्या.

२०१८ मध्ये अदनानला इस्तंबूल पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक केली. यावेळी अदनानसोबतच इतर २०० हून अधिक संक्षयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अदनानला एक हजार ७५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार अदनानविरोधात लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक, राजकीय तसेच लष्करी हेरगिरीसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपांपैकी १० प्रकरणांमध्ये अदनानला दोषी ठरवण्यात आलं आहे.

अदनानबरोबरच लैंगिक अत्याचारांसंदर्भात त्याच्या ओळखीतील एकूण २३६ जणांविरोधात हा खटला चालवण्यात आला त्यापैकी ७८ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अदनानच्या संघटनेमध्ये काम करणारे दोन कार्यकर्ते टरकान यावास आणि ओकटार बाबूना यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. या दोघांनाही दिडशे वर्षांहून अधिक कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टरकानला २११ वर्षांची तर ओकटारला १८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१९९० च्या दशकामध्ये अदनान हा टर्कीमध्ये पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरला होता. अदनान ज्या संप्रदायाचे नेतृत्व करायचा त्या संप्रदायातील अनेकांना सेक्स सॅण्डलमध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो अचानक प्रकाशझोतात आला. ऑनलाइन माध्यमातून ए नाईन टीव्ही या वाहिनीवरुन २०११ पासून अदनान उपदेश करणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण करायचा. या कार्यक्रमामध्ये तो टर्कीमधील धर्मगुरुंवरही टीका करायचा. या वाहिनीला टर्कीमध्ये प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या आरटीयूकेने अनेकदा दंडही केला आहे. अखेर सरकारनेच या वाहिनीच्या प्रसारणावर २०१८ साली बंदी घातली. अदनानच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक महिलांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतल्याचा दावाही केला जातो.

अदनानविरोधातील या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये एका महिलेने काही खळबळजनक आरोप केले. अदनानने अनेकदा आपलं अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. अदनान अनेक महिलांचे लैंगिक शोषण करायचा असंही या महिले म्हटलं आहे. अदनान ज्या महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यांच्यावर तो गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडायचा असा दावाही या महिलेने केला आहे. अदनानच्या घरातून ६९ गर्भनिरोधक गोळ्या तपास यंत्रणांनी जप्त केल्यात.

६४ वर्षीय अदनानने डिसेंबर महिन्यामध्ये सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर आणखीन एक धक्कादायक खुलासा केला होता. आपल्याला एक हजार प्रेयसी असल्याचं अदनानं म्हटलं होतं. महिलांबद्दल मला खूप प्रेम आहे. प्रेम हा एक मानवी गुणधर्म असून प्रेम करणे हे मुस्लिम व्यक्तीचे वैशिष्ट्य असते, असंही अदनानने न्यायालयासमोर म्हटलं होतं.