दोन्ही देशांत तणाव * गंभीर परिणामांचा पुतीन यांचा इशारा ल्ल नाटोची तातडीची बैठक
सीरियातील बंडखोरांवर हल्ले करण्यासाठी गेलेले रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने आपल्या हवाई हद्दीत शिरल्याचा दावा करून मंगळवारी सकाळी पाडले.
या घटनेवरून तुर्कस्तान आणि रशिया यांच्यातील तणाव वाढला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही घटना म्हणजे दहशतवाद्यांच्या साथीदारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे असे म्हटले. तसेच याचे उभय देशांच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी ही फारच गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे. मात्र संपूर्ण माहिती हाती आल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही अशी पुस्तीही जोडली.
तुर्कस्तानने ते सदस्य असलेल्या ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षणविषयक गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संघटनेच्या २८ सदस्य देशांना विमान पाडल्याच्या घटनेची माहिती देण्यात येऊन परिस्थितीवर चर्चा करण्यात येईल. त्याचप्रमाणे तुर्कस्तानने राजधानी अंकारामधील रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना रशियाचे विमान तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत घुसल्याबद्दल समज दिली.
सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या विरोधकांच्या ताब्यातील प्रदेशावर रशियाच्या हवाई दलाने सप्टेंबरपासून हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी सकाळी रशियाचे एसयू-२४ प्रकारचे लढाऊ विमान सीरियात हवाई हल्ले करत असताना शेजारी तुर्कस्तानमध्ये घुसल्याचा तुर्कस्तानने दावा केला. तुर्कस्तानच्या सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार विमान नेमके कोणत्या बनावटीचे हे सिद्ध झाले नाही. पण या विमानाला पाच मिनिटांत दहा वेळा इशारा देण्यात आला. त्याच्या वैमानिकांनी तो धुडकावून लावल्याने त्या प्रदेशात गस्तीवर असलेल्या तुर्कस्थानच्या दोन एफ-१६ विमानांनी रशियाचे विमान हल्ला करून पाडले. तर रशियाने म्हटले आहे की त्याचे एसयू-२४ विमान जमिनीवरून तोफखान्याने केलेल्या हल्ल्यात पडले.

तुर्कस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांनी रशियाचे विमान तुर्कस्तानच्या हताय प्रांतातील यायलादागी जिल्ह्य़ावर असताना पाडले. त्यानंतर विमानाने पेट घेतला आणि ते सीरियाच्या लटाकिया प्रांतातील जबल तुर्कमेन पर्वतीय प्रदेशात पडले. विमानाने पेट घेतल्यानंतर त्यातील दोन वैमानिकांनी हवाई छत्र्यांच्या साह्य़ाने विमानातून उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र खाली उतरताना त्यांच्यावर सीरियातील असाद यांच्या विरोधकांनी जमिनीवरून गोळीबार केला. त्यात एक वैमानिक मारला गेल्याचे विरोधकांनी सांगितले. तर दुसरा वैमानिक अद्याप बेपत्ता आहे. वैमानिकांचा सोडवण्यासाठी रशियाची हेलिकॉप्टर्स तुर्कमेन पर्वतांच्या बायीर बुकाक प्रदेशात शोध घेत आहेत. तुर्कस्तानची हेलिकॉप्टर्सही त्यांचा शोध घेत आहेत.