बँकॉकहून इस्तंबूलला जाणाऱ्या टर्की एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने ते मंगळवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. या विमानात १४८ प्रवासी होते. त्यानंतर विमान निर्जनस्थळी नेऊन त्याची तपासणी केली असता ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
एअरबस ३३० हे विमान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विमानतळावर उतरविण्यात आले आणि ते तातडीने निर्जनस्थळी नेण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे.
विमानातील सामानाच्या कक्षात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा संदेश विमानातील स्वच्छतागृहात असलेल्या एका आरशावर लिहिण्यात आला होता. हा संदेश वैमानिकाला कळविण्यात आला. तेव्हा त्याने तातडीने नागपूरच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. मात्र वैमानिकाने दिल्लीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर हे विमान दिल्लीकडे वळविण्यात आले आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला उतरविण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षारक्षक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले, असे नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. मात्र विमानात कोणत्याही प्रकारची स्फोटके सापडली नाहीत. सामान ठेवण्याच्या कक्षाचीही तपासणी करण्यात आली.
त्यानंतर विमान निर्जनस्थळी नेण्यात आले आणि संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले, असे ते म्हणाले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुरेंद्रसिंग यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली.