गोरखपूर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ७० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. उदासीन आरोग्य यंत्रणेनेच त्यांचा जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर सहारनपूरमधील सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारी आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या प्रसूती वेदना सुरू असताना तिला रुग्णालयात आणले. पण येथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. अखेर दुसऱ्या रुग्णालयात नेताना रिक्षातच तिने बाळाला जन्म दिला.

मुनावर मिश्रा या महिलेला १४ ऑगस्टच्या रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला कुटुंबीयांनी सहारनपूर जिल्हा महिला रूग्णालयात दाखल केले. पण मध्यरात्री अचानक रूग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करा, असा सल्लाही दिला. प्रसूती वेदना सुरू असल्याने तिला लगेच दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. तिला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत होते. पण वाटेतच तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माता आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मुनावरच्या पतीने सहारनपूर जिल्हा महिला रुग्णालयाविरोधात जनपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून चौकशी करण्यात येत आहे.