छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव चोप्रा याच्या वडिलांचं निधन झालं आहे. गौरवचे वडील स्वतंत्र चोप्रा यांना करोनाची लागण झाली होती. तसंच ते अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गौरवने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

गौरवने एका पाठोपाठ अनेक ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात “श्री स्वतंत्र चोप्रा. माझे हिरो, माझी प्रेरणा आणि माझा आदर्श. मी खरंच त्यांच्यासारखा कधी होऊ शकेल का? मला ते शक्य होईल असं वाटत नाही. एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ.. ज्यांनी प्रत्येक वेळी कुटुंबाचा प्रथम विचार केला”, असं गौरवने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“प्रत्येक वडील त्यांच्यासारखे नसतात हे जाणून घ्यायला मला २५ वर्ष लागले. ते खूप खास होते. मी त्यांचा मुलगा आहे यातच मी खरा नशिबवान आहे. त्यांना इतकं प्रेम आणि सन्मान मिळाला. जो मला कधीच मिळाला नाही”, असं गौरवने म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौरवच्या आईचंदेखील निधन झालं होतं. दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून त्या Pancreatic Cancer शी लढा देत होत्या. यातच रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांना करोनाचीदेखील लागण झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.