माहिती व प्रसारण खात्याची कारवाई
काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रक्षेपण तीन किंवा पाच दिवस आक्षेपार्ह आशयाच्या कारणास्तव शिक्षा म्हणून तीन ते पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत अशा तीनशे तक्रारींच्या अनुषंगाने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अशी कारवाई करण्यात आली, असे सरकारने लोकसभेत सांगितले.
भारतात किमान ६०० दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. त्यांच्यावर इलेक्ट्रॉनिक देखरेख केंद्राच्यावतीने लक्ष ठेवले जात असते व त्यातील आशय तपासला जात असतो. त्यात कार्यक्रम व जाहिराती या दोन्हींमध्ये काही आक्षेपार्ह असेल तर ते तपासले जाते, अशी माहिती माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत दिली. गेल्या तीन वर्षांत एकूण ४५० तक्रारी सरकारकडे आल्या, त्यात ३०० प्रकरणात आक्षेपार्ह आशयामुळे कारवाई करण्यात आली, असे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पंचवीसवेळा काही वाहिन्यांवर आक्षेपार्ह आशयामुळे केलेल्या कारवाईत त्यांचे प्रक्षेपण ३ ते ५ दिवस बंद करण्यात आले होते. राठोड यांनी सांगितले की, याबाबत आंतरमंत्री समिती नेमण्यात आली असून दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमात काही नियमांचे उल्लंघन होत असेल तर स्वत:हून कारवाई करण्याचा समितीला अधिकार आहे. त्यात कार्यक्रम व जाहिराती असा दोन्हींचा समावेश आहे. राठोड म्हणाले की, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायदा १९९५ नुसार कारवाई करण्याचा अधिकार समितीला आहे. अभिरूचीहीनता, जाणूनबुजून चुकीची माहिती, सूचकपणे काही गोष्टी प्रदर्शित करणे, स्त्रियांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवणे या कारणास्तव कारवाई केली जाऊ शकते.