टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी स्थानिक भाषा वापरणं केद्र सरकारने अनिवार्य केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यासंबंधी टीव्ही चॅनेल्सना आदेश जारी करणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी येणाऱ्या श्रेय नामावलीत इंग्लिशसोबत स्थानिक भाषेचाही वापर करावा लागणार आहे. हाच आदेश आम्ही चित्रपटांसाठीही लागू करत आहोत असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

‘टीव्ही चॅनेल्सना आम्ही ऑर्डर जारी करत आहोत. अनेकदा टीव्ही मालिकांची श्रेय नामावली इंग्लिश भाषेत असते. पण नव्या आदेशानुसार ज्या कोणत्याही मालिकांचं प्रसारण तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला स्थानिक भाषेचाही वापर करावा लागणार आहे’, असं आदेशात सागंण्यात येणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

जर मालिका निर्मात्यांना मालिकेचं नाव आणि इतर गोष्टीही स्थानिक भाषेत द्यायच्या असतील तर त्यांना तशी मुभा आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. आम्ही कोणतंही बंधन घालत नसून, फक्त भारतीय भाषांचा समावेश करत असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.