उत्तराखंडमधील पूरपीडिताच्या खांद्यावर बसून वार्तांकन करणाऱया हिंदी वृत्तवाहिनीच्या एका वार्ताहराला कामावरून निलंबित करण्यात आले. नारायण पारगाईन असे या पत्रकाराचे नाव असून तो न्यूज एक्स्प्रेस या हिंदी वृत्तवाहिनीसाठी काम करीत होता.
डेहराडूनमधील बिंदाल भागात पुराच्या तडाख्यात सापडलेल्या एका पीडिताच्या खांद्यावर बसून नारायण पारगाईन याने संबंधित घटनेचे वार्तांकन केले. या वार्तांकनाची व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितली गेली. संबंधित वार्ताहराविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर त्याला कामावरून काढण्याचा निर्णय वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापनाने घेतला. नारायण पारगाईन याने केलेली कृती फक्त अमानवीय नसून, वृत्तवाहिनीच्या प्रस्थापित नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असे संबंधित वृत्तवाहिनीने म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ क्लिप ही वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली नाही. ती चुकून कोणीतरी इंटरनेटवर अपलोड केल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली, असेही या वृत्तवाहिनीने स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित घटनास्थळाचे वार्तांकन करताना तेथील लोकांनीच आपल्याला एका पीडिताच्या खांद्यावर बसण्याचा आग्रह केला. मी पाण्यात उतरू नये, अशी त्यांची इच्छा होती, असा खुलासा नारायण पारगाईन याने केला.