मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत हिरो असून प्रत्यक्ष कामांच्याबाबतीत शून्य आहे, अशी टीका मंगळवारी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. काँग्रेस सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात देशात खूपच कमी प्रगती झाली आहे. हे सरकार म्हणजे केवळ घोषणा आणि नारे देणाऱ्यांचे सरकार आहे. जेव्हा टीव्हीवर चमकण्याचा प्रश्न येतो तेव्हा मोदी सरकार हिरो असते. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या कामांचा विचार करायचा झाल्यास मोदी सरकार शून्य असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. गेल्या तीन वर्षात भाजपने फक्त भीती निर्माण करायचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या बैठकीनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. आजच्या बैठकीत काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थिती, अर्थव्यवस्था हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुका आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवले. मोदी सरकारला फक्त तीन वर्षेच पूर्ण झाली आहेत. जेथे सुसंवाद असतात तेथे मतभेदही असतात, जेथे सहिष्णुता असते तेथे चिथावणीही असते, एकीकडे भारतात शांतता आहे तर दुसरीकडे काश्मीरमध्ये संघर्ष, तणाव आणि भीती पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतात वैविध्याची संपन्नता असताना दुसरीकडे देशाला प्रतिगामी व संकुचितपणाकडे ढकलणाऱ्या मोहिमा चालवण्यात येत असल्याचे सोनिया यांनी सांगितले. आजच्या बैठकीला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, जनार्दन द्विवेदी, अंबिका सोनी आणि कार्यकारिणी समिती सदस्य उपस्थित होते.