अध्यक्ष हासन रुहानी यांच्याकडून टीकाकारांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका

इराण सरकारच्या फसलेल्या आर्थिक  धोरणांविरोधात अनेक शहरांत सुरू असलेली निदर्शने निर्वाणीचा इशारा देण्यात येऊनही सुरूच असून, एकूण बारा जण ठार झाले आहेत. सशस्त्र निदर्शकांनी लष्करी तळ व पोलिस स्टेशनचा ताबा घेण्यात प्रयत्न केला असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात काल  रात्री दहा जण मारले गेले आहेत असे सरकारी दूरचित्रवाणीने सांगितले आहे.

अध्यक्ष हासन रुहानी यांनी शांततेचे आवाहन करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. शनिवारी इझेह येथे गोळीबारात दोन जण मारले गेल्याने आंदोलन चिघळले आहे. इराणमध्ये २००९ नंतरची सर्वात मोठी निदर्शने तेथील राजवटीविरोधात सुरू झाली असून, ती आटोक्यात आणताना सरकारला जड जात आहे. दरम्यान, इराणचे अध्यक्ष हासन रुहानी यांनी आताच्या निदर्शनांवर मौन सोडले असून, त्यांनी लोकांना त्यांची मते व टीकाटिप्पणी मांडण्याची पूर्ण मुभा असल्याचे सांगितले. टीका करणे व हिंसाचार करीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यात फरक आहे असेही ते म्हणाले. त्यांनी समेटाची भूमिका घेताना टीकाकारांना स्वातंत्र्य देण्याची तयारी दर्शवली व माध्यमांनी अधिक पारदर्शक व समतोलपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

पोलिसांनी अश्रुधूर व पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून तेहरानमधील इन्कलाब चौकात जमलेल्या निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांनी टाकेस्थान येथे एक शाळा व  सरकारी इमारतींना आग लावली. दोरूड येथे दोन जण चोरलेले फायर इंजिन कोसळल्याने ठार झाल्याचे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. इझेह, केरमनशाह, खोरामाबाद, शाहीनशहर, झांजान येथे निदर्शने सुरूच आहेत. या बातम्यांची खातरजमा करणे कठीण असून प्रवास व इंटरनेट, सामाजिक माध्यमे र्निबध लागू करण्यात आले आहेत. टेलेग्राम व इन्स्टाग्राम या संकेतस्थळांवर नियंत्रणे आणली आहेत. गुरुवारी माशाद येथून आर्थिक धोरणाविरोधातील निदर्शने सुरू झाली,  डेथ टू डिक्टेटर अशा घोषणा निदर्शकांनी या वेळी दिल्या.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, की इराणमधील निदर्शनांमुळे लोक आता शहाणे बनल्याचे दिसत असून पैसा व संपत्ती राज्यकर्तेच कशी चोरत आहेत, दहशतवाद्यांना पैसा पुरवीत आहेत हे त्यांना कळल्याचे म्हटले आहे. तेथील राजवटीचे हे वर्तन लोक फार काळ खपवून घेणार नाहीत. इराणने मानवी हक्कांचे उल्लंघन केले असून, शांततामय निदर्शने सुरू असताना समाज माध्यमांवर र्निबध आणले आहेत हे चांगले नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यावर इराणचे अध्यक्ष रुहानी यांनी सांगितले, की अमेरिकेने महिन्यापूर्वीच इराणला दहशतवादी देश संबोधले आहे. ट्रम्प हे इराणविरोधी असून त्यांना इराणी लोकांबाबत खोटी सहानुभूती दाखवण्याचा अधिकार नाही.

ट्रम्प-रुहानींमध्ये द्वंद्वयुद्ध