सीबीआयने एका महसूल सेवा अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे टाकून २० कोटी रुपये रोख व २० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केली. सात ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते त्यात या अधिकाऱ्याच्या नावे मोठी मालमत्ता असल्याचे दिसून आले आहे.
हा महसूल सेवा अधिकारी सध्या दिल्ली येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा आíथक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी आहे, त्याची मालमत्ता ज्ञात स्रोतापेक्षा खूपच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय महसूल सेवा अधिकारी संजय कुमार व त्याची पत्नी स्मिता सोनी तसेत इतर काही अज्ञात व्यक्तींच्या मुंबई व नवी दिल्ली येथील आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा अधिकारी असलेल्या या भारतीय महसूल सेवेच्या अधिकाऱ्याने त्याच्या व कुटुंबीयांच्या नावाने स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमवली आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीने त्याला विविध ठिकाणी या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिल्याचे समजते. नवी दिल्ली, मुंबई, पाटणा येथील सात ठिकाणी छापे टाकण्यात आले असून अधिकृत व निवासी ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात २० कोटी रुपये रोख तसेच २० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत. त्यात ठेव पावत्या व इतर गुंतवणूक कागदपत्रांचा समावेश आहे.