राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात करोनाचा रुग्णाच्या मृतदेहावर आवश्यक ती खबरदारी न घेता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांत २१ जण मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, १५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत करोनामुळे केवळ ४ मृत्यू झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, करोनाचा संसर्ग झालेला मृतदेह २१ एप्रिल रोजी खीवरा खेड्यात आणण्यात आला. सुमारे दीडशे लोक अंत्यसंस्काराला हजर होते आणि करोनाविषयीच्या नियमांचे पालन न करता हा अंत्यसंस्कार पार पडला.

‘२१ मृत्यूंपैकी फक्त ३ ते ४ मृत्यू कोविड-१९ मुळे झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक वयोवृद्ध आहेत. तरीही, हे करोनाचे सामुदायिक संक्रमण आहे काय हे तपासण्यासाठी, ज्या कुटुंबात मृत्यू झाले आहेत तेथील १४७ सदस्यांचे नमुने आम्ही घेतले आहेत,’ असे लक्ष्मणगढचे उपविभागीय अधिकारी कुलराज मीणा यांनी पीटीआयला सांगितले. प्रशासनाने या खेड्यात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली आहे.

या घटनेच्या संबंधात स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून, तो मिळाल्यानंतरच आपण याबाबत काही सांगू शकू, असे सीकरचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी अजय चौधरी म्हणाले.