प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याची आरोग्यमंत्र्यांची कबुली

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी पहाटे २६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रुग्णालयाला पुरेसा प्राणवायू पुरवठा नव्हता, अशी कबुली राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गोव्याच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे २ ते ६ या कालावधीत २६ रुग्ण दगावले, असे राणे यांनी सांगितले, मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यास त्यांनी नकार दिला. या रुग्णालयाला सोमवारी प्राणवायूचा पुरवठा कमी झाला होता, हे मात्र त्यांनी मान्य केले. या रुग्णालयाला प्राणवायूच्या मोठ्या १२०० सिलिंडरची गरज होती. त्यापैकी फक्त ४०० सिलिंडर सोमवारी उपलब्ध झाले होते, असे राणे यांनी सांगितले.

मृत्यूच्या कारणांबाबत उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. तसेच प्राणवायू पुरवठ्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने हस्तक्षेप करावा, असे राणे म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. राज्यात प्राणवायूचा तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता आणि त्याचा रुग्णालयाला झालेल्या पुरवठ्यादरम्यानच्या कालावधीत काही रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले असावे, असे सावंत म्हणाले.

आंध्रात ११ रुग्णांचा बळी

आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात प्राणवायूअभावी ११ रुग्णांना सोमवारी प्राण गमवावे लागले. पाच मिनिटे प्राणवायूचा दाब कमी झाला होता. या पाच मिनिटांत ११ बळी गेले. त्यानंतर प्राणवायू पुरवठा सुरळीत करण्यात आला, असे रुग्णालयाने स्पष्ट केले.