छप्रा येथून जवळच असलेल्या मशरक येथील धर्मसती प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन योजनेतून विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ झाली आहे. बुधवारी सकाळी आणखी दोन विद्यार्थ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. अजून २५ जणांना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डाळ-भात आणि सोयाबीन खाल्ल्यानंतर ही मुले आजारी पडली. तातडीने त्यांना छप्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर कारवाईसाठी निदर्शने केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक चौकशीत त्यांना मदत करणार आहे. सरण विभागीय आयुक्त आणि पोलीस उपमहासंचालक संयुक्तपणे ही चौकशी करतील.
मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. या घटनेनंतरही राजकारण सुरु झाले आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप भाजपने केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही बिहार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 17, 2013 2:32 am