अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दुहेरी बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी काबुलमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाच्या परिसरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आले. अमेरिका सैन्याला माघार घालविण्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानी संघटनेने हे आत्मघातकी हल्ले घडवून आणले आहेत. संरक्षण मंत्रालयाजवळील पूलाजवळ पहिला स्फोट झाला. या स्फोटानंतर जमलेल्या जमावानंतर दुसरा स्फोट करण्यात आला. अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २४ जण ठार झाल्याचे समजते. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. काबुलमधील इटालियन रुग्णालयाने आपल्या अधिकृत ट्विटवरुन १० जखमी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.  दरम्यान मशिद, महामार्ग आणि सामान्य जनतेवर हल्ले करणाऱ्यांनी मैदानात येऊन सैन्यासोबत  लढावे, अशी तीव्र प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी हल्ल्यानंतर दिली.  दुसरीकडे  पहिल्या स्फोटात संरक्षण मंत्रालयावर निशाणा करण्याचा इरादा होता, तर दुसरा स्फोट हा पोलिसांना लक्ष्य करण्याच्या हेतूने करण्यात आल्याचे ट्विट तालिबानी प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहीद्दिनने केले आहे. काही दिवसांपूर्वीच काबुलमधील अमेरिकन वि्दयापीठावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात १६ जण ठार झाले होते.