इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) अशा अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. देशभरातील एकूण ९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल गुण मिळाले आहेत, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) दिली आहे. १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये दिल्लीच्या निशिकांत अग्रवालचेही नाव आहे. मात्र निशिकांतचा जुळा भाऊ असणाऱ्या प्रणवला या परिक्षेमध्ये ९९.९३ टक्के गुण मिळाले आहेत. म्हणून प्रणव आता पुन्हा एप्रिलमध्ये जेईईची परिक्षा देणार आहे. इतकच नाही देशात सर्वाधिक गुण मिळवणारा निशिकांतही एप्रिलमध्ये पुन्हा परिक्षा देणार आहे.

दिल्लीत राहणारे निशिकांत आणि प्रणव एकत्रच अभ्यास करायचे. मात्र परिक्षेमध्ये प्रणवला निशिकांतपेक्षा ०.०७ कमी गुण मिळाले. यामुळेच आता प्रणवने पुन्हा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. “माझा भाऊ निशिकांत हा देशामध्ये सर्वाधिक मार्क मिळवणाऱ्यांपैकी एक आहे. त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. मला त्याने मिळवलेल्या यशाचा आनंद आहे. पण आणखीन चांगले गुण मिळवण्यासाठी मी पुन्हा परिक्षा देणार आहे,” असं प्रणवने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले आहे. इतकचं नाही तर निशिकांत म्हणजे ज्याला १०० टक्के गुण मिळाले आहेत तो ही पुन्हा परिक्षा देणार आहे. “मला परिक्षा द्यायला आवडतात म्हणून मी पुन्हा परिक्षा देणार आहे,” असं निशिकांतने ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले आहे.

निशिकांत आणि प्रणव हे दोघेही लहानपणापासूनच खूप हुशार आणि अभ्यासू आहेत. त्यांना जेईईमध्ये चांगले मार्क मिळवून दिल्ली किंवा मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. १७ वर्षाचे निशिकांत आणि प्रणव दिवसाला १० ते १२ तास अभ्यास करायचे. “आम्हाला परिक्षा द्यायला आवडते. आम्ही काही महिन्यांपूर्वीच जेईईची तयारी सुरु केली होती,” असं हे दोघे सांगतात.