नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी असलेले सैय्यद अकबरुद्दीन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटरून पाकिस्तानी झेंडा आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांचे छायाचित्र पोस्ट केले आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.


सकाळी अकबरुद्दीन यांच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुन निळे टिकमार्क ही गायब झाले आहे. हॅकर्सने याबरोबरच त्यांच्या अकाऊंटवर तुर्की भाषेत काही संदेशही लिहीला आहे. मात्र, त्यानंतर हे ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आणि या पोस्ट देखील हटवण्यात आल्या.

हे धाडस पाकिस्तानी हॅकर्स गटाकडून करण्यात आले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, सायबर क्राइमसाठी पाकिस्तानात कुठलीही रणनिती अस्तित्वात नाही. त्यामुळे पाकिस्तानातील हॅकर्सच्या निशाण्यावर नेहमीच सरकारी अधिकारीच असतात.

दरम्यान, संसदेत नुकतेच सरकारने सांगितले होते की, २०१६ मध्ये देशात एकूण १९९ सरकारी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. २०१३ पासून २०१६ पर्यंत देशात ७०० पेक्षा अधिक सरकारी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. नुकतेच एका पत्रकार परिषदेत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी देखील सायबर क्राइमबाबत चिंता व्यक्त केली होती.