फेसबुकनंतर ट्विटरही केम्ब्रिज अॅनालिटीकासोबत डेटा स्कॅण्डलमध्ये अडकल्याचं समोर येत आहे. केम्ब्रिज अॅनालिटीकाने कोणत्याही परवानगीविना फेसबुकवरील ८.७ कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. फेसबुक डेटा लीक झाल्यानंतर युजर्सच्या प्रायव्हसीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता ट्विटरचा डेटाही सुरक्षित नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरनेही केम्ब्रिज अॅनालिटीकाला युजर्सचा डेटा विकला आहे. द संडे टेलिग्राफने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, केम्ब्रिज अॅनालिटीकामध्ये काम करणारे आणि फेसबुक डेटा लीक करणारा अॅलेक्सॅण्ड्र कोगन याने २०१५ मध्ये मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवरुन युजर्सचा डेटा खरेदी केली होता. कोगन याने ट्विटरचा डेटा मिळवण्यासाठी जीएसआर (ग्लोबल क्विज रिसर्च) नावाचं कमर्शियल फर्म सुरु केलं होतं.

याप्रकरणी ट्विटरने स्पष्टीकरण देत केम्ब्रिज अॅनालिटीका आणि जीएसआरसारख्या कंपन्यांच्या जाहिराती घेणंही बंद केलं असल्याचं सांगितलं आहे. ट्विटरच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही डेटा चोरला गेला नाहीये आणि त्याची विक्रीही करण्यात आलेली नाही. दरम्यान नेमक्या किती युजर्सचा डेटा लीक झाला आहे याचा आकडा समोर आलेला नाही.

माहितीसाठी केम्ब्रिज अॅनालिटीकाने फेसबुकवरील ८ कोटी युजर्सचा डेटा चोरला आहे. या डेटाच्या माध्यमातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मार्क झुकेरबर्गने माफीदेखील मागितली आहे. डेटा सुरक्षित राहावा यासाठी आपण पावलं उचलणार असल्याचं आश्वासन त्याने दिलं आहे.