राजकीय जाहिरातींबाबत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. “इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरु शकते. राजकारणात या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते”, असं डॉर्सी म्हणालेत.

ट्विटरच्या या निर्णयावर अमेरिकेच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे मॅनेजर ब्रेड पास्कल यांनी ट्विटरच्या निर्णयावर सवाल उपस्थित केलेत. हा ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, ट्रम्प यांच्या विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे लोकशाही मजबूत होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, बीबीसीच्या वृत्तानुसार फेसबुकने मात्र राजकीय जाहिराती बंद करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिलरी क्लिंटन यांनी फेसबुकला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे, तसंच त्यांनी ट्विटरच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.