संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीसमोर हजर होण्यासाठी टि्वटरचे सीईओ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. सोशल मीडियावर नागरिकांचे अधिकार सुरक्षित राखण्याच्या मुद्यावर त्यांना माहिती-तंत्रज्ञान समितीने समन्स बजावले होते. समितीमधील सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.

भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने एक फेब्रुवारीला अधिकृत पत्राद्वारे टि्वटरचे सीईओ आणि अधिकाऱ्यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. सात फेब्रुवारीला संसदीय समितीची ही बैठक नियोजित होती. पण टि्वटरचे सीईओ जॅक डॉर्सी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणखी वेळ देण्यासाठी आता ११ फेब्रुवारीवाला ही बैठक होणार आहे.

माहिती-तंत्रज्ञान समितीकडून टि्वटरला पाठवण्यात आलेल्या पत्रात संस्थेच्या प्रमुखाला समितीसमोर हजर रहावे लागेल तसेच प्रमुखासोबत अन्य प्रतिनिधींनी हजर रहावे असे या पत्रात म्हटले आहे. नागरिकांच्या डाटाची सुरक्षितता आणि सोशल मीडियावरुन निवडणुकीत हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आले आहे.