ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंट्स बंद केल्याची माहिती AFP या न्यूज एजन्सीने दिली आहे. फेक न्यूज सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून पसरवल्या जाऊ नयेत म्हणून ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट आहे. अनेकदा आपल्याही फोनवर अशा प्रकारची माहिती येत असते. मात्र फेक न्यूज रोखल्या जाव्यात म्हणून हजारो फेक न्यूज अकाऊंट बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

फेक न्यूज म्हणजे काय?

कोणत्याही माहितीची शहानिशा न करता फेक न्यूज तयार केल्या जातात. दोन धर्मांमधील तेढ वाढवण्यासाठी, आपसातले शत्रुत्त्व वाढवण्यासाठी, दिशाभूल करण्याच्या उद्देशाने फेक न्यूजचा वापर केला जातो. ही माहिती खरी आहे हे दाखवण्यासाठी न्यूज चॅनल्स, वृत्तपत्रं, वेबसाईट यांची बनावट अकाऊंट तयार करुन त्यावरुन ती ट्विट केली जाते. त्यामुळे ही माहिती खरी आहे असे भासवता येते. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इतर सोशल मीडियाचा वापर यासाठी केला जातो. फोटो शॉपचा उपयोग करुन बातमी, फोटो मॉर्फ केले जातात. ते खरे आहे असे भासवण्यासाठी हे केले जाते.

दरम्यान अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवणारी हजारो अकाऊंट्स आता ट्विटरने बंद केली आहेत. जगभरातून ही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत असंही ट्विटरने म्हटलं आहे.