टि्वटरने बनावट अकाउंटवर सुरु केलेल्या कारवाईमुळे भारतातील अनेक नेत्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. टि्वटरने बनावट अकाउंट विरोधात सुरु केलेल्या या मोहिमेचा सर्वात जास्त फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते शशी थरुर या दोन राजकरण्यांना बसला आहे. अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पर्सनल टि्वटर हँडलवरील फॉलोअर्सची संख्या २ लाख ८४ हजार ७४६ ने कमी झाली आहे. १२ जुलै रोजी मोदींचे टि्वटरवर ४ कोटी ३३ लाख ८३ हजार ५२५ फॉलोअर्स होते. आज १३ जुलैला हीच संख्या ४ कोटी ३० लाख ९८ हजार ७७९ आहे. त्यांच्या अधिकृत पीएमओ इंडिया टि्वटर हँडलवरही १ लाख ४० हजार ६३५ फॉलोअर्स कमी झाले आहेत.

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या फॉलोअर्समध्ये देखील १ लाख ५१ हजार ५०९ इतकी घट झाली आहे. भाजपाचे ४० हजार ७८७ तर काँग्रेसचे १५ हजार ७३१ फॉलोअर्स कमी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २० हजार फॉलोअर्स गमावले आहेत. त्यांचे ७२ लाख ४० हजार फॉलोअर्स होते आता हीच संख्या ७२ लाख २० हजार आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ७४ हजार तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ९२ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. टि्वटरच्या या मोहिमेचा भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतील राजकारण्यांनाही फटका बसला आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही फटका बसला आहे.