नवी दिल्ली : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनीने सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा दर्शविल्याने देशभरात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर  सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा मागे घेतला. त्यामध्ये  जम्मू व काश्मीर आणि लडाख हे स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते.

‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटर संकेतस्थळाच्या करिअर विभागात हा नकाशा दिसताच  नेटिझन्सनी तीव्र निषेध करून  ट्विटरवर कठोर कारवाईची मागणी केली. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता. या मुद्यावर ट्विटरला पाठवलेल्या ई-मेलला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

नव्या समाजमाध्यम नियमांवरून ट्विटर या अमेरिकेतील बडय़ा कंपनीचा भारत सरकारशी संघर्ष सुरू आहे. वारंवार स्मरण करून देऊनही ट्विटरने देशाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांची अवज्ञा केली आहे किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे, असा ठपका सरकारने ठेवला आहे.

ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याची ही कृती या कंपनीला प्रकाशक म्हणून  कायदेशीर उत्तरदायी ठरविण्यास पुरेशी होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

गेल्या वषी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांचे युद्ध स्मारक असलेल्या ‘हॉल ऑफ फेम’ मधून केलेल्या थेट प्रक्षेपणात ट्विटरने ‘जम्मू व काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ असे दर्शवल्यानंतर लोकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती.