आठवड्यात सलग दुसऱ्यांदा भारतात ट्विटरची साईट ‘डाऊन’ झाल्यामुळे मंगळवारी नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली. डेस्कटॉपवर ट्विटर साईट उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर तांत्रिक अडचणीचा संदेश येतो होता. त्यामुळे साईटवर लॉग इनच करता येत नव्हते.
ही समस्या केवळ डेस्कटॉपवरच येत होती. ट्विटरचे आयओएस आणि अॅंड्राईड अॅप्स व्यवस्थित सुरू असल्याचे दिसून आले. डेस्कटॉप साईटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास “Something is technically wrong.Thanks for noticing—we’re going to fix it up and have things back to normal soon.” असा संदेश ब्राऊझरवर येत होता.
ही तांत्रिक अडचण कशामुळे येत होती, त्याबद्दल अधिकृतपणे ट्विटरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ७.५३ ते ८.०३ या काळातही भारतात ट्विटरची सेवा ठप्प झाली होती. काल मोबाईलवरूनही ट्विटर बघण्यास युझर्सना अडचण येत होती. मात्र, त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून, आता ट्विटर सेवा व्यवस्थित सुरू असल्याचे ट्विटरच्या ब्लॉगवर लिहिण्यात आले होते.