ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी ट्विटरवर झालेल्या सायबर हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुनच यासंदर्भात भाष्य करताना आम्ही या समस्येवर काम करत आहोत असं म्हटलं आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ट्विटवरील काही दिग्गज मंडळीची अकाउंट हॅक करुन त्यावरुन विचित्र ट्विट करण्यात आले. अकाउंट हॅक झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकन नेते जो बिडेने, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्याबरोबरच अ‍ॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीच्या मालकीच्या काही खात्यांचा समावेश होता. याचसंदर्भात आता डॉर्सी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आज ट्विटरमध्ये आमच्यासाठी खूप कठीण दिवस आहे. हे सारं घडल्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं आहे. आम्ही याचा तपास करत आहोत आणि नक्की काय झालं हे समजून घेतल्यानंतर आम्ही यासंदर्भातील सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सध्या आमच्या टीम सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असं डॉर्सी यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे.

अनेक मान्यवरांच्या अकाउंटवरुन बिटकॉइन पाठवल्यास ते दुप्पट करुन देणारी माहिती आणि खोटी लिंक शेअर करण्यात आल्यानंतर ट्वीटरनेही यासंदर्भात ट्विट करुन अनेक ट्विटर अकाउंटसंदर्भात समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. “ट्विटरवरील अकाउंटवर परिणाम झाल्याचे आम्हाला दिसून आलं आहे. आम्ही या प्रकरणात चौकशी करत असून याबद्दलची अधिक माहिती लवकरच देऊ,” असं ट्विटर सपोर्टने म्हटलं आहे.

हॅक करण्यात आलेल्या अकाउंटमध्ये अ‍ॅपल, उबेर आणि अन्य काही कंपन्यांच्या ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.