कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्विटर हे सध्या चर्चेत आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटवर गुरूवारी एक अजब प्रकार घडला. गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही वेळासाठी चक्क त्यांचा प्रोफाईल फोटोच गायब झाला होता. युझर्सना याची माहिती मिळताच त्यांनी याचे स्क्रिनशॉट शेअर करण्यास सुरूवात केली. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोच्या जागी ट्विटरनं एक नोटीस लिहिली होती. कॉपिराईट प्रकरणाअंतर्गत ट्विटरनं त्यांचा फोटो हटवल्याचं यात नमूद करण्यात आलं होतं.

परंतु काही वेळानं त्यांचा प्रोफाईल फोटो पुन्हा दिसू लागला होता. परंतु अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर कोणी कॉपिराईट क्लेम केला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यानंतर त्यावर एक नोटीस दिसत होती. ‘कॉपिराईट क्लेममुळे फोटो हटवण्यात आला आहे’, असा संदेश त्या ठिकाणी लिहिलेला दिसत होता. त्यानंतर काही ट्विटर युझर्सनं याचा स्क्रिनशॉट शेअर केला. दरम्यान, बराच काळ त्यांच्या फोटोच्या जागी कॉपिराईटचा संदेश दिसत होता.

आणखी वाचा- भारतात ट्विटरवर बंदी?; लेहचा नकाशा चुकवल्यामुळे सरकारचा कारवाईचा इशारा

ट्विटरवर अमित शाह यांचे २३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दरम्यान, योगायोगानं अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो त्याच दिवशी हटवण्यात आला ज्या दिवशी सरकरानं ट्विटरला लेह हा जम्मू काश्मीरचा भार असल्याचं दाखवल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. या प्रकरणात सरकारनं ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. ट्विटरनं स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.