भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विट करताना हॅशटॅगचा वापर करताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या इमोजीचा वापर करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या इमोजीचे अनावरण केले आहे. आठवड्याच्या अखेरीसदेखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या इमोजींचा वापर करता येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

उद्या (शुक्रवारी) बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती आहे. या निमित्ताने ट्विटरकडून बाबासाहेब आंबेडकर यांचे इमोजी तयार करण्यात आले आहे. #AmbedkarJayanti, #अंबेडकरजयंती, #DalitLivesMatter, #JaiBhim, #जयभीम असे हॅशटॅग ट्विटरवर वापरल्यावर त्यासमोर बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरने तयार केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या इमोजीचे अनावरण केल्याबद्दल ट्विटरने मोदींचे आभार मानले आहेत.

ट्विटरने आयपीएलसाठीदेखील खास इमोजी तयार केले आहेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे इमोजी ट्विटरकडून तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हॅशटॅग वापरुन विराट कोहली, ख्रिस गेल, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंची नावे लिहिल्यास त्यांच्या नावापुढे त्यांचा चेहरा दिसतो. याआधी अनेक सणांवेळीही ट्विटरकडून असे इमोजी तयार करण्यात आले होते.