नवी दिल्ली : भाजप नेते व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या एका ट्वीट संदेशावर ट्विटरने ‘माध्यमी फेरफार’ असे शिक्कामोर्तब केले आहे. भारतात एखाद्या समाज माध्यम कंपनीने सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केलेल्या ट्वीटमधील दिशाभूल दाखवून देण्याचा प्रकार प्रथमच झाला आहे.

२८ नोव्हेंबरला मालवीय यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्वीट संदेश  जारी केला होता. मालवीय यांनी हा संदेश काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पोलिसी अत्याचाराबाबत टाकलेल्या ट्वीट संदेशाला उत्तर म्हणून टाकला होता. त्यात मालवीय यांनी या शेतकऱ्यांना मारहाण केली जात नसून केवळ दम दिला जात असल्याचे म्हटले होते. मंगळवारी ट्विटरने मालवीय यांचा हा संदेश ‘माध्यमी फेरफार’ असल्याचे म्हटले आहे.

ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी कुठलेही छायाचित्र, ध्वनिफीत, चित्रफीत जर बनावट, दिशाभूल करणारी असेल तर त्याचे वर्गीकरण ‘माध्यमी फेरफार’ या गटात करीत असते. यापूर्वी ट्विटरने या वर्गवारीचा वापर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक ट्वीट संदेशांबाबत केला होता.

मालवीय यांच्या या ट्वीट संदेशावर ‘माध्यमी फेरफार’ हा शिक्का आमच्या माध्यम धोरणातील तरतुदींच्या आधारे मारला आहे, असा खुलासा ट्विटरच्या प्रवक्त्याने बुधवारी केला आहे.

प्रकरण काय?

’ राहुल गांधी यांनी निमलष्करी दलातील जवान शेतकऱ्याला मारहाण करतानाचे चित्र ट्वीट केले होते. ‘हे छायाचित्र दुर्दैवी असून जय जवान जय किसान घोषणेच्या विरोधात हे वर्तन आहे. पण आज पंतप्रधान मोदी यांच्या उर्मटपणामुळे जवानांना शेतकऱ्यांविरोधात उभे केले’ असे त्यात म्हटले होते.

’ मालवीय यांनी गांधी यांच्या ट्वीट  संदेशाचा दाखला देऊन दोन तुलनात्मक चित्रफिती असलेला संदेश टाकला होता. त्यातील पंधरा सेकंदाच्या चित्रफितीत सुरक्षा जवानाने शेतकऱ्याला हातही लावला नाही, असा दावा केला होता.

’ राहुल गांधी हे देशातील बदनाम विरोधी पक्षनेते आहेत असे मालवीय यांनी म्हटले होते. त्यांच्या या ट्वीट  संदेशावर सात हजार रिट्विट झाले.

’ ट्विटरने म्हटले आहे की, लोकांची फसवणूक करणाऱ्या ट्विटला आम्ही ‘माध्यमी फेरफार’ गटात टाकतो. फेब्रुवारी २०२० पासून कंपनीने हे धोरण ठरवल्यानंतर भारतात प्रथमच त्याचा वापर करण्यात आला आहे.