पत्रकारितेतील पुलित्झर पुरस्कार नुकतेच जाहीर झाले, पण त्यानंतर लगेचच दोन पत्रकारांनी आपल्या या व्यवसायाला रामराम ठोकला आहे, अशी माहिती स्लेट या संकेतस्थळाने दिली आहे.
 ‘द डेली ब्रीझ’ या वृत्तपत्रातील रॉब कुझनिया व त्याचे सहकारी रिबेका किमिच व फ्रँक सुरासी यांना एका जिल्हय़ातील शिक्षण क्षेत्रात माजलेल्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीचे वृत्तांकन केल्याबद्दल २० एप्रिलला पुलित्झर पुरस्कार मिळाला, पण त्यांच्यातील कुझनिया या पत्रकाराने दोन वेळचे भागत नाही म्हणून शेवटी पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेतला. आता कुझनिया हे यूएससी शोआह फाऊंडेशनमध्ये जनसंपर्काचे काम बघतात. या फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर कुझनिया यांनी म्हटले आहे, की आपल्याला पुरस्कार मिळणार याची खात्री होती. सामाजिक पत्रकारिता ही खणखणीत नाण्याप्रमाणे वाजतेच याची या पुरस्काराने पुन्हा जाणीव झाली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली वृत्तपत्रे ही समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत. कुणीच पाहात नसेल तर काय चाललेय हे कसे कळणार, पण ते काम पत्रकार करीत असतात. कुझनिया यांच्या मते दोन वेळचे भागत नसल्याने त्यांनी पत्रकारिता सोडली, पण नव्या व्यवसायातही खूप आलबेल आहे असे नाही. कुझनिया यांनी लॉसएंजल्स भागात भाडय़ाने खोली घेतली होती, पण ती त्यांना परवडत नव्हती.
 पुलित्झर पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकारिता सोडणाऱ्या एका महिलेचे नाव आहे नताली कॉला हॉफ. तिला कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची आहे, म्हणून तिने हा व्यवसाय सोडला आहे. सात भागांच्या वृत्तमालिकेत तिने काम केले होते. ‘टिल डेथ डू अस पार्ट’ ही वृत्तमालिका ‘द पोस्ट अँड कुरियर’ या चार्लसटनमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यात घरगुती िहसाचार हा विषय होता व कोलंबिया जर्नालिझम रिव्हय़ूने त्याची दखल घेतली होती. या महिलेची कमाल म्हणजे तिने गुन्हय़ाच्या ठिकाणी स्वत:चे फोटो काढले होते तेही नवजात बाळासह. एखाद्या व्यवसायावर निष्ठा कशी असते त्याचे ते उदाहरण होते, पण आता हा व्यवसाय मुलाला वाढवताना करणे शक्य नाही असे तिचे म्हणणे आहे.