गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातून दोन आजारी मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडुरंग मडकईकर गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय़ घेण्यात आला असून त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्सिस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर यांच्या जागी कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आकुक्त कॅबिनेट दर्जाच्या पदावर असलेल्या मिलिंद नाईक यांना संधी देण्यात आली आहे. आज दुपारी ४ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्राच्या माध्यमातून राज्यपाल मृदूला सिन्हा यांना निर्णय कळवला आहे. फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर अमेरिका तर पांडुरंग मडकईकर यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंत्री आजारी असल्याने भाजपावर टीका होत होती. सरकारी आजारी पडलं असल्याची टीका करत जमत नसेल तर आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी ट्विट करत मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील अशी माहिती दिली होती. ‘गोवा प्रदेश भाजपा कोअर कमिटीशी चर्चा केल्यानंर मनोहर पर्रीकरच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मंत्रीमंडळात बदल केले जातील’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two ailing ministers d souza and madkaikar drops from cabinet
First published on: 24-09-2018 at 13:04 IST