एका हिंदू युवतीसोबत आपल्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील निबंधकांच्या कार्यालयात गेलेला एक मुस्लीम तरुण व त्याचा भाऊ अशा दोघांना पोलिसांनी राज्याच्या नव्या धर्मातरविरोधी कायद्याखाली अटक केली.

उत्तर प्रदेशातील नव्या धर्मातरविरोधी अध्यादेशानुसार, अशारीतीने आंतरधर्मीय लग्न करताना, युवतीला धर्मातर करायचे असल्यास तिने त्याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणे अनिवार्य आहे. या प्रकरणात या युवतीने अशी नोटीस दिली होती काय, अशी विचारणा बजरंग दलाचे कार्यकर्ते या जोडप्याला करत असल्याचे एका ध्वनिचित्रफितीत दिसत होते.

या तरुणीच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे दोघा जणांना अटक करण्यात आल्याचे कांठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय गौतम यांनी सांगितले.

आपण सज्ञान असून, काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या मर्जीने या तरुणाशी लग्न केले असल्याचे या युवतीने सांगितले. मात्र तिने धर्मही बदलला काय, हे लगेच कळू शकले नाही.

मुरादाबाद येथील रशीद हा डेहराडून येथे नोकरी करत असताना तेथे शिकणाऱ्या या युवतीशी त्याची भेट झाली होती.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधल्यानंतर पोलीस निबंधकांच्या कार्यालयात पोहोचले. या दोघांना नंतर दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येऊन नंतर तुरुंगात पाठवण्यात आले. आता याप्रकरणी काय तो निर्णय न्यायालय घेईल, असे पोलिसांनी सांगितले.