येणार, येणार म्हणून मागच्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेले राफेल फायटर विमान अखेर जुलैच्या अखेरीत भारतात दाखल झाले होते. आज औपचारिकरित्या राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश करण्यात आला. हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. याआधी भारतीय हवाई दलाकडे इतकी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली विमाने नव्हती. राफेलची शस्त्रास्त्रे खासकरुन मिसाइल सिस्टिम या विमानाला घातक बनवते.

फायर अँड फर्गेट: स्काल्प मिसाइल
– स्काल्प हे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाइल आहे. ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. या मिसाइलमुळे इंडियन एअर फोर्सला शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

– राफेलच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या वैमानिकाला आता लक्ष्याच्या जवळ जाऊन हल्ला करण्याची आवश्यकता नाही. तो दूर अंतरावरुन लक्ष्यावर मिसाइल डागू शकतो. त्यामुळेच बालाकोट सारखा एअर स्ट्राइक करण्यासाठी आता पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याची गरज नाही. आपण भारतात राहूनच पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ नष्ट करु शकतो. त्यामुळे सरकारमधील नेते आणि एअर फोर्सचे अधिकारी राफेल युद्धाच्याकाळात गेमचेंजर ठरेल असे सांगत आहेत.

नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे मिटिऑर
– मिटिऑर हे एअर टू एअर म्हणजेच हवेतून हवेत मारा करण्यासाठीचे सर्वोत्तम क्षेपणास्त्र आहे. बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे क्षेपणास्त्र आहे. मिटिऑर क्षेपणास्त्राद्वारे १२० ते १५० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान पाडणे शक्य आहे. सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे मिटिऑरसारखे अत्याधुनिक क्षेपणास्त्र नाही. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांनी भारताच्या फायटर विमानांवर अम्राम मिसाइल्स डागले होते. अम्राम सुद्धा १०० किमी रेंज असलेले बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाइल आहे. त्यावेळी आपल्या सुखोई फायटर विमानांनी ही सर्व अम्राम मिसाइल्स यशस्वीरित्या चुकवली होती. त्यामुळे तेव्हा भारताकडे राफेल असते तर पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चांगलीच अद्दल घडवली असते.

– मात्र आता यापुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये बालाकोटनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीप्रमाणे तणाव निर्माण झाला आणि त्यामधून हवाई युद्ध झाले तर भारताची राफेल विमाने थेट नजरेच्या पलीकडील लक्ष्याचा वेध घेत अगदी १२० ते १५० किमी दूरवर असणारे विमान सहज पाडू शकतील. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतरही त्याचा नियोजित मार्ग बदलता येतो. त्यामुळे हे अधिक घातक आणि परिणामकारक ठरते.