आसामच्या दिब्रूगड येथे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला करीत बंडखोरांनी स्फोट घडवून आणले. यांपैकी पहिला स्फोट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ जवळ झाला तर दुसरा स्फोट दिब्रूगडमधील एका गुरुद्वारा जवळ झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आतमध्येच हे दोन स्फोट झाले.

आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांच्या माहितीनुसार, या दोन्ही स्फोटांच्या घटनांची माहिती कळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, या स्फोटांमागे आसाममधील बंडखोर संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम-इंडिपेंडंट (उल्फा-आय) या संघटनेचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या बंदी असलेल्या संघटनेने आसामच्या जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. सर्वसाधारणपणे अशा संघटना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच बंदचे आवाहन करीत असतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.