वकिलांच्या संघटनेच्या निवडणुका अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच मंगळवारी जिल्हा न्यायालयात काही मिनिटांच्या कालावधीतील दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तथापि, या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाच्या आवारात दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला एका मिनिटात दोन स्फोट झाले, असे कानपूरचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक शालाब माथूर यांनी सांगितले. या घटनेची खबर मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले तेव्हा त्यांना तेथे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. श्वानपथक आणि न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.
वकिलांच्या संघटनेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने कोणीतरी खोडसाळपणा केला असून, फटाक्यांचा वापर करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या घटनेनंतर न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी करण्यात येत असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.