सीरियातील दहशतवादी कृत्यांना निधी उपलब्ध करून चिथावणी दिल्याचा आरोप दोन ब्रिटिश महिलांवर ठेवण्यात आला असल्याचे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सांगितले. अमल एल्वहबी (२७) आणि नवल मसाद (२६) अशी या महिलांची नावे असून त्यांनी सीरियातील दहशतवादी कारवायांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिथ्रो विमानतळावरून इस्तंबूलला जाण्यासाठी विमानात चढत असतानाच गेल्या गुरुवारी एल्वहबी हिला अटक करण्यात आली. त्यानंतर मसाद हिला लंडनमधून त्याच दिवशी अटक करण्यात आली.
या दोन्ही महिलांना वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्यावर दहशतवादी कृत्यांची तयारी करणे आणि चिथावणी देणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.