रक्षाबंधनासाठी घरी गेलेल्या दोन भावांनी आपल्या बहिणीची हत्या करुन तिच्या घरातून ६ लाखांचा मुद्देमाल चोरल्याची गंभीर घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. ४ ऑगस्ट रोजी अहमदाबाद येथील सरिता रेसिडेन्सी येथे हा प्रकार घडला आहे. साजिउल शेख आणि रोजोली शेख अशी दोन आरोपी भावांची नावं असून मयत पावलेल्या महिलेचं नाव सौकी उर्फ रिमा रामस्वरुप साधु असं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही भावांनी आपल्या बहिणीच्या हत्येची योजना आधीच आखून ठेवली होती. रक्षाबंधनासाठी घरी गेल्यानंतर, सौकी उर्म रिमाने आपल्या भावांना राखी बांधली. यानंतर दोघांसाठी चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली असताना दोन्ही भावांनी धारदार शस्त्राने आपल्या बहिणीची हत्या केली. यानंतर दोन्ही भावांनी आपल्याच बहिणीच्या घरातून सोनं आणि चांदीचे ६ लाख रुपये किमतीचे दागिनेही चोरले.
आणखी वाचा- …आणि सासरेच जावयाचं कापलेलं मुंडकं घेऊन पोहोचले पोलीस ठाण्यात
पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या चौकशीत, साजिउल आणि रोजोली या दोन्ही भावांनी २ ऑगस्ट रोजीच हा प्लान आखला होता असं पुढे आलंय. साजिउलचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला होता. यासाठी आपली बहिण जबाबदार असल्याचा राग साजिउलच्या मनात होता. यानंतर साजिउलने लग्नासाठी पुन्हा प्रयत्न केले, परंतू मनासारखी मुलगी मिळत नसल्यामुळे त्याच्या मनात बहिणीविषयीचा राग अजुन वाढला. साजिउल हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याचं लग्न झाल्याशिवाय राजोलीचं लग्न होऊ शकणार नव्हतं. यासाठी दोन्ही भावांना योजना आखत आपल्या बहिणीची हत्या केली. मयत सौकीचं हे दुसरं लग्न होतं. याआधी सौकीने राकेश नेपाळी या इसमाशी लग्न केलं होतं. राकेशच्या मृत्यूनंतर तिने रामस्वरुप साधुशी विवाह केला. रविवारी दोन्ही भावांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 4:21 pm