छत्तीगढमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगांचा स्फोट घडवून आणला असून यात सीमा सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


ताडवाली जंगलांमध्ये काही नक्षलावादी लपून बसल्याची खबर या जवानांना मिळाली होती. त्यासाठी त्यांनी या जंगलामध्ये शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. तसेच त्यांनी आयईडीचा स्फोटही घडवून आणला. या भीषण स्फोटात संतोष लक्ष्मण आणि नित्यानंद नायक हे दोन जवान शहीद झाले. बस्तरचे पोलीस महासंचालक विवेकानंद सिन्हा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या दोन्ही बाजूंकडील गोळीबार थांबला असून दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव जंगलातून बाहेर आणण्यात आले आहे. या चकमकीत काही नक्षलावादीही मारले गेल्याचे कळते मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी या हल्ल्यातील शहीद जवानांच्याप्रती दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. सिंह म्हणाले, हा भ्याड हल्ला असून सर्वांनी या हल्ल्याची एका सुरात निंदा करायला हवी.

यापूर्वी २० मार्च रोजी छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील ९ जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा रक्षकांनी मोठी मोहिम सुरु केल्याने संतापलेले नक्षली अशा प्रकारचे हल्ले घडवून आणत आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच काही नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या कारवाईला घाबरून आत्मसमर्पण केले होते. तर अनेक नक्षली सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारले गेले आहेत.