नवी दिल्ली : अमेरिकेने दिलेले सल्ले आणि सूचनांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने अखेर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे. बुधवारी ड्रोन्सच्या माध्यमातून अमेरिकेने हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यात एका कमांडरसह तीन जण ठार झाले आहेत. रॉयटर्सच्या हवाल्याने एनएनआयने हे वृत्त दिले आहे.


अमेरिकेच्या या बॉम्ब हल्ल्यात हक्कानी नेटवर्कच्या तीन कमांडर्सचा खात्मा झाला आहे. अमेरिकेकडून सातत्याने दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले केले जात आहेत. अहवालानुसार, ड्रोनच्या माध्यमातून दोन क्षेपणास्त्र दहशतवादी ठिकाणांवर डागण्यात आले होते. या हल्ल्यात हक्कानीचा कमांडर अहसन अका खोरे हा मारला गेला आहे.

ताजा ड्रोन हल्ला हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागातील शानकिला भागात झाला आहे. यापूर्वी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली होता. यापूर्वी १७ जानेवारी रोजी देखील अफगाणिस्तानात अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला होता, ते ठिकाण पाकिस्तानी सीमेपासून जवळच आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथून पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते सारा सैंडर्स यांनी पाकिस्तानला तंबी देताना सांगितले होते की, त्यांनी आपल्या जमीनीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करु नये.