गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपणाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार आज पहाटे भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला दाखल झाले. आज पहाटे दोन वाजता गोवा विमानतळावर ते आले व दिल्लीला रवाना झाले. गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिरोडकर व सोपटे यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु दोन आमदार काँग्रेसमधून भाजपात गेल्यामुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे पहाटे दोन वाजता दिल्लीवारीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाने सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, गोव्यामध्ये काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये आणि एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांचे म्हणणे जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा नेता हा भाजपमधूनच निवडला जावा असं वाटतं, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावं असा मुद्दा मांडत आहे.

सुदिन ढवळीकर होणार मुख्यमंत्री?

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पर्रिकर यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्रीपदाची सुत्रे मंत्रीमंडळात सर्वांत ज्येष्ठ असलेल्या मंत्र्याला पर्यायाने बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कडे सोपवावी, अशी मागणी रेटून धरली आहे.