देशद्रोहाच्या आरोपाखाली कोठडीत असलेला पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यासोबत छायाचित्र काढून घेण्याचा हव्यास दोन पोलिसांना चांगलाच महागात पडला आहे. हार्दिक ताब्यात असताना त्याच्यासमवेत छायाचित्र काढणाऱ्या शहर गुन्हा अन्वेषण विभागातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

हार्दिक याच्यासमवेत काढलेले चित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होताच कॉन्स्टेबल महेंद्रसिंह जवनसिंह याला निलंबित करण्यात आले, तर गुन्हा अन्वेषण विभागात संगणकचालक म्हणून काम करणाऱ्या अरुण डाले यालाही निलंबित करण्यात आले आहे.
हार्दिक पटेल हा सदर दोघा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असताना महेंद्रसिंह याने डाले याला हार्दिकसमवेत आपले छायाचित्र काढण्यास सांगितले. हार्दिक पटेल हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात बसला असून त्याच्या शेजारी महेंद्रसिंह साध्या वेशात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. एखादा आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याच्यासमवेत छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता हे दोघे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. एका पोलिसाने छायाचित्र काढले, तर दुसरा हार्दिकच्या शेजारी उभा राहिला. त्यामुळे दोघांना निलंबित केल्याचे पोलीस उपायुक्त दीपन भद्रन यांनी सांगितले.

‘प्रथमदर्शनी देशद्रोह’
अहमदाबाद : गुजरातमधील पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्याविरुद्ध सुरत येथे नोंदविलेला एफआयआर रद्द करण्यास गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पटेल याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी दशद्रोहाचा खटला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तथापि, दोन समाजात वैमनस्य निर्माण केल्याबाबतचे कलम एफआयआरमधून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हार्दिकने पोलिसांना ठार मारण्याचा सल्ला युवकाला दिल्याने त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी देशद्रोहाचा खटला असल्याचे म्हटले आहे.