जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे सात जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. तर भारतीय सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरूच असताना तेथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काळजी घेतली जात असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून यापूर्वीही स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी तसे करण्यात आले होते. कारण त्यातून पसरणाऱ्या अफवांमुळे व चुकीच्या माहितीमुळे हिंसाचाराची शक्यता असते. तत्पूर्वी रविवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. भारतीय जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.